आरोपींकडून चोरीचा माल जप्त! तीन कोळसाचोर पकडले

वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आरपीएफद्वारे कोळसा चोराविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. मागील सप्ताहात पुलगाव आरपीएफने सात लोकांना ताब्यात घेतले होते. यातच सोमवारच्या रात्री वर्धा आरपीएफने तीन कोळसा चोरांना रंगेहात पकडले. या आरोपींकडून अडीचशे किलो कोळसा आणि दोन नग फिश प्लेट जप्त करण्यात आल्या. वर्धा आरपीएफच्या टीमने सोमवारी रात्री 11.30 वाजता वर्धा-चितोड़ा रेल्वेलाइन 758/1147 वर सापळा रचला. जिथे तीन लोकांना रेल्वेच्या जवळपास 250 किलो कच्चा कोळसा तसेच इंजीनियरिंग विभागाच्या 2 नग फिश प्लेटसह संशयास्पद स्थितीत पकडण्यात आले.

चौकशीत त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कठोरपणे विचारताच तिघांनी अंधाराचा फायदा उचलत सिग्नलवर थांबलेल्या कोळशाच्या लोडमधून वर चढून कोळसा खाली पाडला. त्यानंतर खाली पाडलेल्या कोळशाला तिथेच पडलेल्या लोखंडी पट्टीने फोडून पोत्यात भरल्याची माहिती समोर आली. दोन पंचांना बोलावून पकडलेल्या तीनही आरोपींकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला. आरक्षक सागर लाखे यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले.

आरोपींमध्ये आनंदनगर निवासी विक्की फुलमाली (वय 30), सुधीर फुलमाली (वय26) व जाफर खान (वय 46) यांचा समावेश आहे. 21 डिसेंबरला नागपूर येथील रेल्वे न्यायालयात तिघांना सादर करण्यात आले. या संपूर्ण कारवाईला नागपूर आरपीएफचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्‍त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात खुफिया शाखेचे निरीक्षक सुधीर मिश्रा, वर्धा आरपीएफचे निरीक्षक विजय त्रिपाठी, उपनिरीक्षक विनोद मोरे, उपनिरीक्षक राकेश यादव, प्रधान आरक्षक काकडे, आरक्षक सागर लाखे, आरक्षक मंगेश दुधाने आदींनी पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here