
वर्धा : घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या बालकास मारहाण करीत तोंड फोडले. ही घटना गॉडप्लॉट परिसरात २६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. तेजस कुरसंगे हा घरासमोर खेळत असताना पवन विलास मानकर याने त्याला मारहाण केल्याने तोंडातून रक्त निघाले. तेजस रडत रडत घरी गेला असता घडलेला सर्व प्रकार त्यांने वडील पंडित कुरसंगे याला सांगितला.
दरम्यान, पंडितने पवन मानकर याच्या घरी जात त्याला मुलाला का मारहाण केली, याबाबत विचारणा केली असता तुझ्या मुलाने घरासमोर कुस्त्या केल्या. त्याला दूर जाण्यास सांगितले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे मी मारहाण केली. असे म्हणत पंडितलाही शिवीगाळ केली. अखेर पंडित कुरसंगे याने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत जखमीला तोंडावर गंभीर दुखापत झाली असून पुढील तपास सुरू आहे.





























































