विखणीत भरदुपारी भीषण अग्निताडव! चार घरांची झाली राखरांगोळी

सिंदी (रेल्वे) : सिंदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोडणाऱ्या विखणी (जसापूर) गावातील चार घरांना बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन चार तासात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. पण, स्थानिक पालिकेची अग्निशमन दलाची मदत मिळाली नाही, असा संतापजनक प्रश्‍न गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

समुद्रपूर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या विखणी गटग्रामपंचायतच्या आदिवासी पाड्यातील सतीश कौरती व त्यांचा भाऊ गजानन कौरती, दिपक कौरती आणि संजय कन्नाके या आदिवासी कुटुंबातील चार घरांना अचानक आग लागल्याचे लक्षात आले. चारही घरातून धूर निघतांना दिसताच शालेय विद्यार्थ्यांनी आरडा ओरड केली. दुपारची वेळ असल्याने लोकवस्तीमध्ये मोजकेच नागरिक हजर होते. घटनेची सूचना विखणी येथील अमोल सोनटक्के यांनी सिंदी न. प. कार्यालय व पोलिस निरीक्षक सिंदी यांना स्वतः दिली. पण, पालिकेचा वाहनचालक गैरहजर होता. त्याला शोधण्यात वेळ गेला. त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी एक तास उशिरा निघाली. दरम्यान, विखणीच्या 130 तरुणांनी एकजूट दाखवून आग विझवण्याचे प्रयत्न केले. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर सिंदी पालिकेचे अग्निशमन दलाचे पथक विखणीत पोहचले. या प्रयत्नात काहींना किरकोळ इजा पोहचली आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. घटनास्थळी सिंदी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तथा तलाठी पोहचले त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे नक्की कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here