
आर्वी : तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा प्रियकराने विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघड झाली आहे. तिचे दुसऱ्या मुलासोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. काहीच धागेदोरे नसताना सहा दिवसांच्या प्रयासाने पोलिसांनी याचा छडा लावला.
नवव्या वर्गात शिकणाऱ्या विध्यार्थिनीचे दोन महिन्यांपूर्वी संजयनगर येथील अजय ऊर्फ गोलू गंगाधर आत्राम (वय २४) या मुलासोबत सूत जुळले. दोघांचीही जवळीक वाढली. अशातच बुधवारी (ता. २३) रात्री दोन वाजताच्या सुमारास मुलीने आईच्या भ्रमणध्वनीचा वापर करून गोलू आत्राम याला घरी भेटावयास बोलावले. याच दरम्यान तिच्या पूर्वीच्या प्रियकरासोबत संबंध न ठेवण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. आई उठल्याची चाहूल लागताचा दोघेही जवळच असलेल्या गभणेच्या शेतातील विहिरी लगत पोहोचले. वाद विकोपाला गेला आणि गोलूने तिला विहिरीत ढकलले.
आईला मुलगी घरात दिसली नसल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, तिचा दुप्पटा विहिरीजवळ आढळला. यामुळे तिने आत्महत्या केली असावी असा कयास लावला गेला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, तपास सुरूच ठेवला आणि अखेर सहा दिवसांच्या अथक प्रयासानंतर अजय ऊर्फ गोलू आत्राम याला अटक केली.
असा लागला छडा
मुलीने आत्महत्या केली असावी यावर ठाणेदार संजय गायकवाड यांचा विश्वास बसला नाही. कोणतेही धागेदोरे नसताना शोध सुरू केला. मुलीच्या दप्तराची तपासणी केली. यात मोबाईल नंबर लिहिलेल्या लहान चिठ्ठ्या दिसल्या. यातील एका चिठ्ठीवर पूर्वीच्या प्रेमीचा नंबर होता तर दुसऱ्या चिठ्ठीवरील भ्रमणध्वनीचा एक नंबर दिसत नव्हता. त्याचा सिडीआर बोलावला तो आरोपी गोलू आत्राम याचा निघाला आणि प्रकरणाचा छडा लागला.
असा बळावला आरोपीचा संशय
मृत मुलीचे पूर्वी संजयनगर येथील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तो कामासाठी मुंबईला निघून गेला. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांपूर्वी तिचे गोलू आत्राम सोबत सूत जुळले. याच दरम्यान पूर्वीचा प्रेमी गावात आला. गोलुला मृत मुलगी त्याच्या सोबत बोलताना दिसली. यामुळे त्याचा संशय बळावला आणि दोघांत वाद होऊन प्रकरण खुनापर्यंत पोहोचले.


















































