नियमांचे उल्लंघन! ७७ लाख ६७ हजारांचा दंड केला वसूल; गाफील राहिल्यास जिल्ह्यावर ओढवणार कोविडची तिसरी लाट

वर्धा : कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्तीने वाहतूक तसेच जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सर्वच स्तरांतून करण्यात आले. परंतु, अनेक व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यावर कोविडची दुसरी लाट ओढवली. जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरली असली, तरी याच कोविड संकटाच्या काळात बेशिस्तांकडून तब्बल ७७.५७ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वास्तव आहे.

कोविडच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पण, अनेक व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानल्याने कोविड विषाणूच्या संसर्गाला खतपाणी मिळाले. कोविड नियंत्रण पथकांनी आतापर्यंत तब्बल ९१ हजार ३१४ व्यक्तींवर धडक कारवाई करून त्यांच्याकडून ६९ लाख ४१ हजार ३२४ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, याच कोविड संकटाच्या काळात वाहतूक नियमांना बगल देणाऱ्यांकडून पोलीस विभागाने ८ लाख १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली, तरी प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

दंडवसुलीत वर्धा उपविभाग अव्वल

वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट असे महसूलचे तीन उपविभाग जिल्ह्यात आहेत. कोविडची पहिली तसेच दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना या तिन्ही उपविभागांत कोविड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न झाले. असे असले तरी वर्धा उपविभागाने सर्वाधिक दंडवसुली केल्याचे सांगण्यात आले.

फॅन्सी नंबरप्लेटची क्रेझ कायमच

फॅन्सी नंबरप्लेट वाहनाला बसवणे कायद्यान्वये गुन्हा आहे. अशी नंबरप्लेट वाहनाला बसवणाऱ्यांवर वाहतूक नियमान्वये कारवाई केली जाते. मागील पाच महिन्यांत फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या २२५ वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १२५ वाहनचालकांकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूणच, कोरोनाकाळातही फॅन्सी नंबरप्लेटची क्रेझ कायम असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

विनासीटबेल्ट वाहन चालवण्यात मानली जातेय धन्यता

१ जानेवारी ते मे अखेरपर्यंत तब्बल २ हजार ६६८ व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यापैकी एक हजार ९८६ व्यक्तींकडून ३ लाख ९७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने सीटबेल्ट बांधणे क्रमप्राप्त आहे. परंतु, अनेक व्यक्ती विनासीटबेल्ट वाहन चालवण्यात धन्यता मानत असल्याचे या पाच महिन्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here