बंदीनंतरही वर्धेकरांचा सुसाट संचार! रस्त्यावरील गर्दी रात्रीपर्यंत कायमच; पोलिसांचाही अल्पावधीतच हटला पहारा

वर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी याला वर्धेकरांनी हरताळ फासल्याचे चित्र बघायला मिळाले. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर नागरिकांचा मुक्त संचार राहिल्याने ही स्थिती कोरोनाला निमंत्रण देणारी आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले. पोलिसांनीही शहरातील शिवाजी चौक, आर्वीनाका, पावडे चौक आदी परिसरात नाकेबंदी करुन नागरिकांना सूचना केल्यात. तसेच शिवाजी चौकामध्ये वाहने अडवून काहींकडून दंडही आकारण्यात आला. पण, पोलिसांचीही नाकेबंदी औटघटकेची ठरल्याने नागरिकही सुसाट झालेत. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी ओसरलेले पहावयास मिळाली पण, बसस्थानकाबाहेर गर्दी दिसून आली. जिल्ह्यात इतरही ठिकाणी संचारबंदीचे तीनतेरा वाजलेलेच दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here