
वर्धा : सेलू तालुक्यातील येळाकेळी गावात अवैध व्यवसायांचा बोलबाला असून, यावर पायबंद घालणे कठीण झाले आहे. आक्षेप घेतला, तर ठार मारण्याची धमकी दिली जाते. या सर्व अवैध व्यावसायिकांना सावंगी पोलिसांचे पाठबळ आहे. त्यामुळे गावातील दारूविक्रीसह अन्य अवैध व्यवसायांवर पायबंद घालावा, अशी मागणी येकाळेकी ग्रामपंचायत सदस्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात सर्व सदस्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांना निवेदन दिले.
येळाकेळी गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे. दारूविक्रीसह मटका व अन्य अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी मंदिरांनादेखील सोडले नाही. मंदिर परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी मंदिर परिसरात ठाण मांडून असतात. दारूची झिंग चढली की, अश्लील शिवीगाळ करतात. याबाबत सावंगी पोलिसांना रितसर लेखी तक्रार करण्यात आली. परंतु पोलिसांनी कोणत्याहीप्रकारची कार्यवाही केली नाही.
पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. ग्रामपंचायत सदस्यांकडे नागरिक या त्रासाची कैफीयत मांडत असल्याने आम्ही अनेकदा अवैध व्यावसायिकांना समज देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात येते. दारूविक्री व मटका व्यवसायाला आळा घालण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यामुळे आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. तरी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आता कारवाईकडे गावकऱ्यांचे लक्ष
सरपंच वंदना चलाख, उपसरपंच रूपेश पिंपळे, भाऊराव कोहळे, प्रियदर्शनी ठाकरे, वंदना चलाख, ममता घोंगडे, विमल कंडे, राहुल येलारे, उषा उडाण, हितेश भांडेकर, अशोक येलारे, शीतल गडकर, वसंत करनाके, भाजपचे सेलू तालुकाअध्यक्ष अशोक कलोडे यांनी गावात अवैध व्यवसायांत गुंतलेल्या व्यावसायिकांची यादीदेखील अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांना दिली असून, आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलीस चौकीची केली मागणी
येळाकेळी गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. गावालगत अन्य खेडीसुद्धा आहेत. मात्र गावात अवैध व्यवसाय व अन्य असामाजिक घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गावात कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी, अशी मागणी सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे.