शिकवणीवर्ग चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! गर्भधारणेने प्रकार झाला उघड; तळेगाव ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : १६ वर्षीय पीडितेचे शिकवणी चालकाने वारंवार बळजबरीने लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. १६ वर्षीय पीडितेची आठव्या वर्गापासून राहुल भारती या शिक्षकाकडे शिकवणी होती. मार्च महिन्यापासून ऑफलाइन शिकवणी सुरू झाली होती. आरोपी राहुल भारती हा पीडितेचा गृहपाठ तपासत असताना तिच्याशी नेहमी असभ्य वर्तन करून तिला मारहाण करायचा.

सप्टेंबर महिन्यात पोळा सण असल्याने शिळवणीला दोन दिवस सुटी होती. ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ‘पीडिता शिकवणीला गेली असता एकही विद्यार्थी नव्हता. पीडितेने विचारपूस केली असता राहुल भारती याने पीडितेशी बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राहुल भारती याने १२ सप्टेंबर रोजीदेखील पीडितेचे शोषण केले. २० नोव्हेंबर रोजीही बळजबरीने अत्याचार केला.

प्रकृती बिघडल्याने पीडितेच्या आई-वडिलांना पीडितेला आर्वी येथील रुग्णालयात नेले असता, ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. अखेर पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी राहुल भारती याच्याविरुद्ध ३७६,३२३, ५०६ भादंवि सहकलम ४, ६ लैंगिक बाल संरक्षण अधिनियम २००२ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here