
वर्धा : जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर करुणाश्रमात योग्य उपचार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात येते. त्या अनुषंगाने करुणाश्रम आणि वनविभागाच्या संयुक्तवतीने रॅपिड रेस्क्यू टीम स्थापन करण्यात आली. या चमूने योग्य उपचारानंतर बरे झालेल्या तब्बल २१ वन्यप्राण्यांना नव्याने जंगल परिसरात सोडून जीवदान दिले.
मागील दोन दशकांपासून आशिष गोस्वामी यांच्या नेतृत्वात जखमी वन्यप्राण्यांवर करुणाश्रमात उपचार दिले जातात. त्यांच्या या कार्याला वनविभागाचीही तेवढीच मदत आहे. वर्धा वनविभागाने जखमी झालेल्या वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीमची स्थापना केली आहे. या टीमद्वारा गंभीर परिस्थितीत वन्यप्राण्यांना रेस्क्यू करून करूणाश्रम येथे उपचारासाठी ठेवले जाते. यशस्वी उपचारानंतर तंदुरुस्त झालेल्या अशा २१ वन्यप्राण्यांना नैसर्गिक आवासात मुक्त करण्यात आले. यामध्ये अतिशय दुर्मिळ असलेला एक खवल्या मांजर, अंडी खाणारा साप, घोणस साप, नाग, एक मोर, पान कोंबड्या, दोन वानर आणि इतर वन्यप्राण्यांचा यात समावेश्र होता.
प्राण्यांची मुक्तता उपवनसंरक्षक राकेश शेपट यांच्या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडेकर, वनपरिक्षेत्राधिकारी खरांगणा येथील गजभिये, पीपल फॉर अँनिमल्सचे सचिव आशिष गोस्वामी यांच्या निरीक्षणात रॅपिड रेस्क्यू टीम सदस्य वनरक्षक माधव माने, वनरक्षक शिवाजी राठोड, वनरक्षक विक्की चव्हाण, वनरक्षक दिनेश मसराम, वनरक्षक जंगले, पठाण तसेच पीपल फॉर अँनिमल्स चमूतील कौस्तुभ गावंडे, रोहित कंगाळे, सुमित अन, ऋग्नवेद आदींची उपस्थिती होती.
















































