

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाचा तपास सुरू असताना डॉ. कदम यांच्या घराच्या खोलीची शनिवारी रात्री झाडाझडती घेतली. सलग 9 तास चाललेल्या कारवाईत तब्बल 97 लाख 42 हजार रुपयांची रोख मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, याबाबत आयकर विभागाला माहिती दिली आहे. त्यामुळे आता. आयकरविभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील कदम हॉस्पिटलमध्ये गर्भपात प्रकरणाचा तपास करताना यापूर्वी 12 कवट्या अन 54 हाडे मिळाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर काळवीटाचे कातडेही सापडले होते. या प्रकरणात दररोज काहोतरी नवनवीन माहिती समोर येत असून, शनिवारी घराची झडती सुरू असताना खोलीतील कपाटात रोख रक्कम सापडली. आजपर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा लोकांना अटक आहे.
तपासादरम्यान, डॉ. नीरज कदमला अटक केल्यानंतर पोलिसांनी कदमच्या रुग्णालयाच्यावर असलेल्या घरात तपासणी केली. मात्र, त्यावेळी एका खोलीची चावी मिळाली नव्हती. शनिवारी कदम कुंटूबियाकडन त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली. पोलिसांनी खोली उघडून तपासणी केली असता 3 कपाटांतून तब्बल 97 लाख 42 हजार 772 रुपये सापडले. याचा हिशेब मागितला असता कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. याबाबत आयकर विभागाला माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.