

हिंगणघाट : सायंकाळी तीन चोरट्यांनी मुख्य वस्तीतील एका घरात प्रवेश केला. मात्र, चोरटे दिसताच घरात असलेल्या महिलेने आरोळी ठोकली. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्या महिलेला जखमी करीत घरातून पळ काढला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता दरम्यान शहरातील राममंदिर वॉर्डातील पंजाब नॅशनल बँकेच्या मागील परिसरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राममंदिर वॉर्डातील पंजाब नॅशनल बँकेच्या मागील बाजूस असलेल्या गल्लीतील राजेश बाबूलाल कोचर यांच्या घराच्या मुख्य व्दारातून चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी घरात असलेल्या महिलेने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी चाकू हल्ला केला. यात महिला जखमी झाली असून चोरट्यांनी सोबत आणलेली दोरी व चाकूचे कव्हर तेथेच टाकून पळ काढला. चोरट्यांजवळ दोन चाकू व बंदूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार संपत चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपास सुरु केला.