सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प! धावत्या टँकरवर पडली झाडाची फांदी; चालक थोडक्यात बचावला

सेवाग्राम : सेवाग्राम-वर्धा मार्गाचे काम सुरू असून, या मार्गाने जात असलेल्या एका ट्रँकरवर झाडाची मोठी फांदी पडली. यामुळे टॅकरचे नुकसान झाले असून, या मार्गावरील वाहतूक सहातास विस्कळीत झाली होती. रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांच्या फांद्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्या तत्काळ तोडण्याची मागणी होत आहे.

गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास डी. एन. ०९ यू. ९८३६ क्रमांकाचा टँकर सेवाग्राम-वर्धा मार्गाने जात होता. या मार्गावरील म्हाडा वसाहतीसमोरील एका अजस्त वृक्षाची मोठी फांदी या धावत्या टँकरवर पडली. यामुळे या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून एका बाजूने रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

फांदी काढून टँकर बाजूला घेण्याकरिता तब्बल सहा तासांचा वेळ लागला असून, तोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्याकरिता सेवाग्राम पोलीस ठाण्याचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता माथुरकर, कनिष्ठ अभियंता आचार्य घटनास्थळी पोहोचले. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती विजय आगलावे, प्रकाश इंगळे, महेंद्र मुनेश्वर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फाद्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्या तोडण्याची मागणी केली. पोकलॅण्डने ही फांदी काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here