ई-हक्क आज्ञावलीद्वारे हक्काच्या नोंदी सातबारावर फेरफार घेण्यासाठी आता घरुनच करता येणार अर्ज

वर्धा : जमीनीच्या खातेधारकास किंवा संबंधित व्यक्तीला आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हक्काच्या नोंदी सातबारावर फेरफारच्या स्वरुपात घेण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे अर्ज करावे लागतात. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने ई-हक्क नावाची एक ऑनलाईन आज्ञावली विकसित केली आहे. या आज्ञावलीद्वारे संबंधितांना घरुनच फेरफार करण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ई-हक्क या आज्ञावलीमध्ये नागरिकांनी करावयाच्या अर्जाचे सहा प्रकार व बँकांनी करावयाच्या तीन प्रकारच्या अर्जाचा समावेश आहे. नागरिकांनी फेरफारसाठी करावयाच्या सहा प्रकारच्या अर्जामध्ये वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अज्ञान पालककर्ताचे नाव कमी करणे, एकत्र कुंटूंब पुढारी, म्यानेजर (एकुम्या) कमी करणे, विश्वस्तांचे नाव कमी करणे, संगणकीकृत सातबारामधील चुक दुरस्त करण्याचा समावेश आहे. बँकांनी करावयाच्या अर्जामध्ये ई-करार नोंदी, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे याचा समावेश आहे.

फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई-हक्क प्रणालीतून ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. अशा फेरफार प्रकारासाठी आवश्यक कागदपत्र स्व-साक्षांकीत करुन पीडीएफ स्वरुपात अपलोड करावी लागतील. दाखल केलेल्या अर्जाला नंबर व त्याची ऑनलाईन पोच देखील अर्जदाराला मिळेल. या अर्जाची स्थिती प्रत्येक टप्प्यावर अर्जदारास तपासता येईल. प्रत्येक टप्प्यावर अर्ज स्विकारला, कारण देऊन परत पाठविला, फेरफार तयार केला का, नोटीस काढली का, नोटीस बजावण्यात आली का, रुजु करण्यात आली का, फेरफार मुदतीत हरकत आली का, फेरफार मंजूर झाला का, ऑनलाईन सातबारा दुरुस्त झाला का अशा प्रत्येक टप्प्यावर अर्जदाराच्या मोबाईलवर संदेश प्राप्त होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here