

वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वरुडचा समावेश करण्यात आला असून या गावातील विकासाला चालना दिली जात आहे. परंतु वरुड येथील रेल्वेस्थानक सध्या भग्नावस्थेत असून इमारतीच्या भिंती भेगाळल्या असून वर झाडे उमविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रेल्वेस्थानकाच्या इमारतीचे दिवस कधी पालटेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सेवाग्राम लगतचे वरुड रेल्वे स्थानक सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. येथे लोकल रेल्वे गाड्या थांबत असल्याने या ठिकाणाहून रेल्वेत प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या रेल्वे स्थानकावर सकाळी नागपूरकडे जाताना भुसावळ, दुपारला काजीपेठ तर परतीसाठी नागपूर-भुसावळ व काजीपेठ अशा गाड्या नियमित सुरु होत्या. मात्र, कोरोनाकाळात लोकल गाड्या बंद करण्यात आल्या असून त्या अद्यापही सुरुझाल्या नाहीत. अत्यंत महत्वाच्या असलेल्या वरुड येथील रेल्वे स्थानकाची अवस्था सध्या बिकट झाली आहे. येथील पायऱ्या फुटल्या असून भिंतीलाही भेगा गेल्या आहेत. या इमातीमध्ये झाडेही वाढली असून ही. इमारत आता धोकादायक वळणावर आहे. याच दुर्लक्षित इमारतीचा फायदा मद्यपी उचलत असून रात्रीच्या वेळी त्यांचा येथे ठिय्याच असतो. त्यामुळे प्रवशांसाठी मोठी अडचण होत आहे.