

आजनसरा : राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान नागरिकांसाठी बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी घालून दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याने आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानात पुरणपोळी स्वयंपाकासह समाधी दर्शनही बंद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व देवस्थानच्या अध्यक्षांच्या सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसरात चारचाकी वाहनांना प्रवेश निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून श्री संत भोजाजी महाराज देवस्थान नागरिकांसाठी बंद राहणार आहे. केवळ मंदिरातील पुजारी व समितीने नेमलेल्या मोजक्या व्यक्तीसह हरिपाठ, काकडा आरती, दैनंदिन समाधी पूजन नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजव पर्वत तसेच विश्वस्त मंडळीकडून देण्यात आली आहे.