भिसीच्या नावाने दोघांकडून नागरिकांची झाली फसवणूक! ठाणेदारांना निवेदन; कारवाईची मागणी

वर्धा : भिसीच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करीत दोघांनी पोबारा केल्याने फसवणूक झालेल्या नागरिकांनी दोघांवर कारवाई व्हावी, अशी मागणी ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांना निवेदनातून केली आहे. गौतम देशभ्रतार आणि आशिष कांबळे यांनी सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवून भिसीच्या नावाखाली जिल्ह्यातील अनेकांची फसगत केली आहे. दोघांचाही अवैध सावकारीचा व्यवसाय असून, २५ ते ३० टक्के दराने व्याज वसूल करून लहान व्यावसायिकांना ते फसविण्याचे काम करतात.

त्यांनी भिसीचा ४० पुरुष व महिलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनविला. ही भिसी २१ ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आली. प्रत्येक सप्ताहाला २००० रुपयांप्रमाणे समाजाच्या आर्थिक विकास व भिसीच्या नावावर वसूल करणे सुरू केले. दर सप्ताहात ८० हजारांची रक्‍कम जमा होत होती. आतापर्यंत ९ ड्रॉ झाले असून, त्यात सुमारे ७,२०,००० रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यांनी ४० सदस्यांपैकी १३ सदस्य डमी भरले. त्यात त्याची पत्नी, मुलगा, नातेवाईक आदींचाही समावेश असून, त्यांच्या नावावर पैसा उचलायचा. मात्र, याचा हिशोब कोणालाही दाखवत नव्हता. पैशाची गरज असलेल्या व्यक्‍तीला बोली लावायची असते. त्यांनी ती बोली लावल्यानंतर जो पैसा शिल्लक राहतो तो पैसा इतर सदस्यांना सारखा प्रमाणात वाटल्या जातो. तो पैसाही त्यांनी स्वतःकडेच ठेवला व त्याचा कोणालाच हिशोब दिला नाही.

सर्व व्यवहार स्वतः कडेच गुप्तपणे ठेवले. पण इतर २८ सदस्य भिसीचे पैसे जमा करीत होते. मात्र, हा प्रत्येक ड्रॉ डमी नावाने उचलून त्या पैशावर व्याजाचा धंदा करीत असे. काही सदस्यांना याचा संशय येताच त्यांनी विचारणा केली. त्याने तुमचे पैसे परत घेऊन जा, असे म्हणत दमदाटी केली. पण पैसे देण्यास टाळाटाळ केली असून, पैसे देण्यास नकार दिला. दोघांवर कारवाई करुन पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी विनोद खुशाल चंदनखेडे, अनिल भुजाडे, संदीप भगत, प्रतिभा बुचुंडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here