सत्याग्रही घाटातील अपघात! पाच वाहने धडकली; ३ जखमी: पहाटे घडली घटना

वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तब्बल पाच वाहने एकमेकांवर धडकली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

नंदू ज्ञानेश्वर सोळंके, भागवत रामदास तेलंगरे व पुरुषोत्तम बेराडे तिन्ही रा. जालना अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. माहितनुसार, जी. जे. ०३ बी. टी. ६४३२ क्रमांकाचा नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान सिमेंटचे पोल घेऊन अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या एम. एच. २१ एक्स ५१५३ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिली. यात नंदू, भागवत व पुरुषोत्तम हे तिघे जखमी झाले.

अपघात झाल्याचे लक्षात येताच जखमींना मदत करण्यासाठी मागाहून येणाऱ्या एम. एच. ०४ बी. ओ. ६७४१ क्रमांकाच्या ट्रक चालकाने आपले वाहन थांबविले. अशातच एम. एच. ३२ सी. ७८६४ क्रमांकाची कारही थांबली. पण मागाहून येणाऱ्या अज्ञात भरधाव ट्रकने कार व ट्रकला धडक दिली. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.

या अपघातामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने २ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. जखमींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here