दुचाकीने अचानक घेतला पेट अन्‌ राहिला फक्त ‘सांगाडा’! बॅचलर रोडवरील घटना

वर्धा : दुचाकी दुरुस्त करीत असतानाच अचानक पेट्रोलचा भडका उडून दुचाकीने पेट घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. पाहता पाहता दुचाकी जळून कोळसा होत फक्त सांगाडाच उरला. ही घटना ११ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बॅचलर रोडवर असलेल्या काँग्रेस कमिटीच्या सद्भावना भवनच्या लगत घडली. या घटनेमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती.

मंजू जालन रा. बोरगाव (मेघे) यांची दुचाकी अचानक खराब झाल्याने ती दुचाकी घेऊन त्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बॅचलर रोडवरील सद्भावना भवनाच्या खाली असलेल्या सुरेश गाडी रिपेअरिंग सॅटरमध्ये घेऊन गेल्या. दुचाकी दुरुस्ती करीत असताना पेट्रोल लीक होत होते. दरम्यान अचानक करंट चेक करीत असताना दुचाकीने पेट घेतला. कारागिराला काही कळण्यापूर्वीच दुचाकीचा भडका उडाला. लागलीच या दुचाकीच्या आगीने रौद्ररुप धारण केले. जवळपास एक तास ही आग सुरू होती. या आगीत दुचाकीचे सर्व भाग जळून राख झाले असून शेवटी फक्त लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला. यात दुचाकी मालकाचे मोठे नुकसान झाले असून ही घटना पाहण्याकरीता शेवटपर्यंत मोठी गर्दी उसळली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here