
सेवाग्राम : बिलाचा भरणा न केल्याने वीज कनेक्शन कापण्यास गेलेल्या वीज तंत्रज्ञाशी धक्काबुक्की करून मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. येसंबा येथे ही घटना घडली. मयूर अरुण फाळके आणि ज्ञानेश्वर राऊत हे येसंबा येथे ग्राहक केशव बुरांडे यांच्याकडे ५१०३ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने वीज कनेक्शन कापण्यासाठी गेले होते.
वीज कापल्यानंतर किरण बुरांडे याने वाद करून आमच्या घरची वीज कशी कापली, असे म्हणून शिवीगाळ केली, तसेच गावात पुन्हा आले तर जीवे ठार मारेन, अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात मयूर फाळके यांनी तक्रार दिली आहे. काही महिन्यांपूर्वी वीज कापण्यास गेलेल्या अभियंत्यालाही मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना वाढत चालल्या असून नागरिकांनी वेळीच समजण्याची गरज निर्माण झाली आहे. महावितरणने थकीत वीज देयकं भरण्याचे आवाहन केले असून बील न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले.






















































