

अल्लीपूर : कॅनॉलचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या कामगारांच्या झोपड्या ट्रॅक्टरच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. यामुळे कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बबन वरुटकर (रा. नागपूर) यांचे कान्होली शिवारात ठेकेदारीचे कॅनॉलचे काम सुरू असल्याने मनसावळी येथील वसंता नारायण वैद्य यांच्या कान्होली शिवारातील शेतात कॅनॉलचे काम करणारे कामगार टिनाचे शेड टाकून राहत होते. याच परिसरात विविध साहित्य, मोटार, डिझेल आदी होते; पण या ठिकाणी प्रमोद इंगोले यांनी येत ट्रॅक्टरच्या साह्याने कामगारांच्या झोपड्या जमीनदोस्त केल्याने कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर काही कामगारांना मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बबन वरुटकर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, पुढील तपास सुनील गाडे करीत आहेत.