


पवनार : परिसरात आज दुपारी आलेल्या वादळी पावसाने मोठा कहर केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे आश्रम परिसरात असलेले अनेक वर्षांपूर्वीचे पिंपळाचे प्रचंड झाड गडगडाटासह कोसळले. हे झाड चिवड्याच्या दुकानांच्या पट्ट्यालगत होते. कोसळताना हे झाड थेट एका चिवड्याच्या दुकानावर पडले. झाडाचा प्रचंड जोर एवढा होता की संपूर्ण दुकानातील सगळे साहित्य अक्षरशः जमीनदोस्त झाले.
दुकानदाराने वर्षानुवर्षे मेहनतीने उभारलेली सामग्री या घटनेत नष्ट झाली. परिसरात चिवड्याच्या व्यवसायासाठी अनेक दुकाने थाटलेली आहेत. झाड कोसळल्यामुळे या पट्ट्यातील अन्य दुकानांचेही मोठे नुकसान झाले असून दुकानांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. दरम्यान, या घटनेत मोठ्या अपघाताचा प्रसंग मात्र थोडक्यात टळला. झाड कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीच दुकानात काम करणारी ऐक महिला प्रसंगावधान राखून वेळेत बाहेर धाव घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आजच्या या अनपेक्षित वादळामुळे पवनारमध्ये अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या असून, वीज पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांत झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज विभागाने शर्थीचे प्रयत्न करून पुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले, मात्र तरीही तीन तासांपर्यंत नागरिकांना अंधारात राहावे लागले. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते.