

पवनार : आचार्य विनोबा भावे यांच्याद्वारे स्थापित परमधाम आश्रम परिसरात प्रतिष्ठापित करण्यात आलेली बुद्धमूर्ती ही जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील अप्रतिम मूर्ती असल्याची ख्याती आहे. सुमारे दीड हजार वर्षे पुरातन असलेली ही मूर्ती वाकाटक, गुप्त काळात तयार करण्यात आल्याची माहिती आहे. पवनार येथील प्राचीन बुद्धमूर्ती ही केवळ मूर्ती नव्हे, तर विदर्भातील बौद्ध संस्कृतीचा गूढ इतिहास उजळवणारा ठसा आहे.
पवनारजवळील दत्तपूर येथे लाल रंगाच्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती खोदकामात सापडली. मूर्तीचे डोके व उजवा हात नष्ट झाला होता. मूर्ती सडपातळ अंगकाठीची असून वस्त्रांच्या बारीक सुरकुत्या स्पष्ट दिसून येतात. ही प्रतिमा मानवी अंगकाठीच्या आकाराची असून, तिचा उजवा हात अभय मुद्रेत असावा, ज्यामध्ये चिवराचे एक टोक धरलेले असून दुसरे टोक खाली लोंबकळत आहे. डाव्या हातावर कोरलेले चक्र हे महापुरुषत्वाचे लक्षण आहे. मूर्ती आश्रमात आणून तिचे डोके बसवले गेले आणि प्रतिष्ठापना पार पडली.
इसवीसन पाचव्या ते सहाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा या परिसरातील प्रमुख धर्म होता. तथागत गौतम बुद्धांच्या काळात नाग लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. नागांची घनदाट वस्ती भंडारा, वर्धा, चंद्रपूर, नागभीड, पवनी या भागांमध्ये होती, हे ब्रिटिश इतिहासकार कनिंगहॅम यांनी मान्य केले आहे. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींच्या आठ भागांपैकी एक भाग पूर्व विदर्भात आणण्यात आला होता, ज्यावर पवनी येथे स्तूप बांधण्यात आला. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्माला खरी चालना मिळाली आणि मौर्यांची सत्ता पवनार परिसरात होती, हे येथे सापडलेल्या मद्यकुंभाच्या तुकड्यांवरून स्पष्ट होते.
—
पुरातत्त्वीय महत्त्व…
ही बुद्धमूर्ती वाकाटक आणि गुप्त काळातील स्थापत्यशैलीचे अनमोल उदाहरण आहे. वस्त्रांची रचना, मुद्रांची बारकावे आणि वापरलेला पाषाण यावरून त्या काळच्या शिल्पकलेचे प्रगत स्वरूप दिसून येते. डाव्या हातावरील चक्र हे बौद्ध प्रतीक असून, मूर्तीची रचना महापुरुष लक्षणांची जाणीव करून देते. सापडलेल्या परिसरात पूर्वी बौद्ध विहार असावेत, असा अभ्यासकांचा कयास आहे.
वारशाची जपणूक आणि भविष्याची दिशा….
परमधाम आश्रमात उभ्या असलेल्या तथागत बुद्धांच्या मूर्तीला पाहताना, इतिहासाच्या शांत सादेसोबत करुणा, संयम, आणि धम्माची शिकवण मनात रुजते. पवनारचा परिसर हा केवळ विनोबांची कर्मभूमी नसून, तो हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक प्रवाहाचा भाग आहे. या प्राचीन वारशाचे जतन आश्रमीय कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून होत असून, भविष्यातही ही मूर्ती धम्माची साक्ष आणि प्रेरणा ठरू शकेल.