

खरांगणा (मोरांगणा) : अनैतिक संबंधाला विरोध केल्याचा राग अनावर झाल्याने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठार करणाऱ्या आरोपी मुलास पोलिसांनी तत्काळ अटक केली.त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सोपान मुरलीधर पुसदकर (वय 3२, रा. काचनूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे गावातील एका महिलेसोबत अतैतिक संबंध असल्याने त्याला आईने विरोध केल्यामुळे गुरुवारी रात्रीला मायलेकांत जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सैतान झालेल्या आरोपी मुलाने वरवंटा डोक्यावर मारून आईला जागीच ठार केले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खरांगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत आरोपी मुलाला अटक केली. त्याने या घटनेत वापरलेला वरवंटा स्नानगृहात लपवून ठेवला होता. पोलिसांनी तो जप्त केला असून, पुढील तपास खरांगण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे व त्यांचा चमू करीत आहे. आपल्या भावानेच आईला संपविल्याचे कळल्यावर दोन बहिणींना विश्वासच बसला नाही.