
वर्धा : ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाला प्रवेश करून देण्याचे आमिष देत बहीण – भावाकडून १५ लाख ४१ हजार रुपये उकळून फसवणूक केली. ही घटना म्हाडा कॉलनी हिंगणघाट शहरात घडली. ३१ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
माया विठ्ठल ढगे (६७, रा. हिंगणघाट) यांनी तिचा मुलगा आणि मुलगी यांचे ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी आरोपी शुभम साहेबराव शेट्ये (रा. पिंपरी, पुणे) याच्या बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यात १५ लाख ४१ हजार रुपये जमा केले. त्यानंतर शुभमने माया यांना २०२३ पर्यंत मुलांचा प्रवेश होईल, असे आश्वासन दिले. मात्र, फेब्रुवारी २०२४ उजाडला असताना प्रवेश न झाल्याने शुभमला वेळोवेळी प्रवेशाबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, शुभमने मॅनेजमेंट कोट्यातील पूर्ण राऊंड संपल्याने पुढील राऊंडमध्ये प्रवेश होईल, असे सांगितले. मात्र, पूर्ण राऊंड संपूनही प्रवेश झाला नसल्याने माया यांनी आरोपी शुभमकडे पैसे परत मागितले. मात्र, शुभमने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर माया ढगे यांनी हिंगणघाट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शुभम शेट्ये विस्द्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
















































