

देवळी : दुर्गामूर्तीचे विसर्जन करून परत येणाऱ्या देवीभक्तांची ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होत उलटली. हा अपघात नजीकच्या वाटखेडा चौक परिसरात घडला. यात २१ भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झाला. जखमींना देवळी येथील ग्रामीण रुणालय, सावंश्री (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय तसेच वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवळी तालुक्यातील वाटखेडा येथील नागरिक सार्वजनिक दुर्गामूर्तीच्या विसर्जनासाठी कोटेश्वर येथे गेले होते. दुर्गामूर्तीच्या विसर्जनानंतर देवीभक्त ट्रॅक्टर-ट्रॉलीने परतीचा प्रवास करीत असताना वाटखेडा चौफुलीवर वळण रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित होत उलटला. यात २१ भाविक जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी विनय कापसे यांनी सहकार्य केले.