

सेलू : सेलू-हिंगणी येथे बोरनदी परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्यांवर सेलू पोलिसांनी शनिवारी 16 जुलै रोजी वॉश आउट मोहीम राबवून 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल नष्ट केला. गेल्या काही दिवसांपासून सेलू पोलिस ठण्यांतर्गत येणाऱ्या हिंगणी, झडशी, सेलू परिसरात नदी नाल्याकाठी गावठी दारूच्या भट्टया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याची कुणकुण लागताच ठाणेदार रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सेलू पोलिस व डीबी पथकाने सेलू हिंगणी येथे बोर नदी परिसरात वॉश आउट मोहीम राबवून सुरू असलेल्या दारू भट्टया उध्वस्त केल्या.
यात दारू काढण्यासाठी वापण्यात येणारे लोखंडी ड्रम, दारू काढण्यासाठी तयार केलेला मोहा रसायन सोडवा, गावठी दारू भरलेल्या प्लॅस्टिक डबक्या, असा एकूण 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे, एएसआय ज्ञानेश्वर खैरकार, डीबी पथक प्रमुख या अखिलेश गव्हाणे, कपिल मेश्राम नारायण वरठी, सचिन बाटखेडे यांनी केली. पांढऱ्या दारूची पंढरी म्हणून ओळख असलेल्या हिंगणी येथील गावठी दारूचे कारखाने व झडशी गावातील दारू विक्रीवर पोलिसांच्या कारवाईने कोणताही असर झाला नसल्याचे एकूणच चित्र आहे. कारवाईमुळे परिसरातील व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहे.