

पवनार : शेतातील झाडाला दोराने गळफास घेऊन तरूण शेतकर्याने आत्महत्त्या केल्याची घटना सेलू तालुक्यातील वाहितपूर शिवारात घडली. आशिष महादेव भट वय ३० वर्षे रा. पवनार असे गळफास घेतलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
घरुन शेतात पाणी ओलवायला जातो असे सांगत आशिष रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घरुन निघून केला. परंतु बराच वेळ झाला तरी आशिष घरी परत आला नसल्याने कुटूंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला मात्र संपर्क होत नसल्याने मित्रांनी त्याचा शोध घेत शेत गाठले असता आशिष शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढलून आला.
आशिष हा अतिशय कष्टाळू तरूण होता. आई-वडिल, पत्नी आणि दोन लहान मुले असा संसाराचा गाढा तो हाकत होता. त्याच्याकडे तीन एकर शेती होती त्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्याने आपल्या शेतालगतच असलेली काही शेती ठेक्याने केल्याची माहिती मिळाली काही गटाचे कर्जही त्याने शेती कसण्याकरीता घेतले होते.
कर्जाचा डोंगर असल्याने ते कसे फेडायचे याच विवंचनेतून त्याने आपले जीवण संपविल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची माहिती कुटूंबातील सदस्यांनी सेलू पोलिसांना दिली यावरुन सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे.