

वर्धा : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 6 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून, आतापर्यंतची ही वाढ पावणेचार रुपयांवर गेली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात वाहनचालकांची होरपळ सुरू आहे.
सुमारे चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील पाच दिवसांत चार वेळा प्रतिलिटर 80 पैसे वाढ करण्यात आली होती. आज पेट्रोलच्या दरात 50 पैसे आणि डिझेलच्या दरात 55 पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे सहा दिवसांत पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे पावणेचार रुपयांनी महागले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.