चार महिन्यांत २.२६ लाख गरजूंना मिळाला शिवभोजनचा लाभ! जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट दिला वाढवून

वर्धा : कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना कुणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली. तसेच जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट वाढवून तो २,१०० पर्यंत दिला. एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यात २ लाख २६ हजार ६०० गरिबांना निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार मिळाला आहे.

शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला. गरीब व गरजू लोकांना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्यांतर्गत आठ तालुके मिळून १७ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व केंद्राला शासनाने प्रतिदिन १ हजार ६०० थाळ्यांचा इष्टांग मंजूर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून शासनाने १५ एप्रिल २०२१ पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली.

तसेच प्रतिदिन थाळीच्या इष्टांकात दीड पट वाढ केली. वर्धा जिल्ह्यात सरासरी १ हजार ८०० ते २ हजार १०० थाळ्यांचा लाभ गरीब व गरजू तसेच अनाथ लोक दररोज या सर्व केंद्रावरून घेत आहे. एकूणच शासनाची ही योजना गरजुंना आधार देणारी ठरत आहे.

१७ केंद्रांना वितरित केले अनुदान

या योनजेंतर्गत वर्धा जिल्ह्यात एकूण १७ केंद्रावर या थाळीचा लाभ गरीब व गरजू लोक घेत आहे. १५ एप्रिल ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २ कोटी ४३ लाख २३० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील १७ केंद्रावरून २ लाख २६ हजार ६१३ गरीब व गरजू लोकांनी या थाळीचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे १७ शिवभोजन केंद्राला शासनाच्या नियमाप्रमाणे १४ ऑगस्ट २०२१ पर्यंतचे संपूर्ण अनुदान वितरित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here