

तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगला लगत असलेल्या जुनोना शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असून त्याने एका आठवड्यात दोन पाळीव जनावरांचा फडशा पाडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुनोना शिवार हा जंगल व्याप्त परिसर आहे. वन्यप्राणी शेतात प्रवेश करून उभ्या पिकांची नासाडी करतात. त्यामुळे या शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना रात्री शेतात जागलीला जावे लागते. अशातच आता पट्टेदार वाघाचा ही या परिसरात वावर असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये दहशत पसरली आहे.
एका आठवड्यात पट्टेदार वाघाने दोन जनावरांना ठार केल्याने तळेगाव येथील शेतकरी राजेंद्र ठाकरे आणि किसन केने यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुनोना शिवारात शेत जमिनी असलेले शेतकरी अल्पभूधारक असून या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजू ठाकरे, किसन केने, किसना कळसकर, सुभाष पाचपोहर, उत्तम भुयार, प्रकाश गाडगे, सुधाकर मांडळे, प्रल्हाद भोजने, मारोत भोजने, नारायण भोजने, अरविंद सायवान, रामराव घोडे, पुंडलिक इरखडे, किसन उईके, अनिल रिठे, अनिल फसाटे, विनोद खवले, राजू बुले, विनोद बोडखे आदींनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.