

समुद्रपूर : तालुक्यातील गोविंदपूर येथील राहुल राजू डुकसे याचा भंडारा जिल्ह्यातील पवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, राहुलचा अपघाती मृत्यू नसून त्याची नियोजित पद्धतीने हत्या केल्याचा आरोप वडील राजू डुकसे यांनी केला असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
राहूल डुकसे हा जेसीबीचा व्यवसाय करायचा. जेसीबीत बिघाड आल्याने तो पार्ट आणण्यासाठी त्याच्या कारने (एम.एच.२६ इ.एम.०९५९) नागपूर येथे गेला होता. काही दिवस तो मित्रांसोबत राहिला. दरम्यान, एका विवाहित महिलेने राहुलला आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. पण, राहुलने तिला प्रतिसाद दिला नाही म्हणून विवाहितेने काही मुलांना सोबत घेऊन माझ्या मुलाची हत्या केल्याचा आरोप निवेदनातून राजू डुकसे यांनी केला आहे.
१४ एप्रिलला पवन पोलिसांनी राहुल इुकसे याच्या कार अपघातासंबंधी गुन्हा दाखल केला. मात्र, मोक्क्यावरील परिस्थिती पाहता कार पलटी करून माझ्या मुलाला पाठीवर व मानेवर रॉडने तसेच तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या जखमा होत्या. ही बाब नागरिकांनी व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजू डुकसे यांनी गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकडी करुन पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.