वर्ध्यात 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय! पालकमंत्र्यांनी केली पाहणी

सतीश अवचट

वर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे रोज बाधित होणारी रुग्णसंख्या बघता भविष्यात वैद्यकीय सुविधा कमी पडू नये यासाठी उत्तम गलवा लोखंड निर्मिती प्रकल्पाजवळ असलेले सुरेश देशमुख इंजिनियरिंग कॉलेज आणि लॉइड्स विद्या निकेतन येथे 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय तयार करण्यास पालकमंत्री सुनील केदार यांनी मान्यता दिली असून, टप्प्याटप्प्याने हे रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल होईल.

पालकमंत्री सुनील केदार आणि जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सदर ठिकाणाची आज पाहणी करून उत्तम गलवा आणि आयनॉक्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून वर्धेतही रोज 500 पेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे. शिवाय दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा अंदाजही आरोग्य विभागाने सांगितला आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णसंख्येत होणारी वाढ, रुग्णांना लागणारे बेड, गंभीर परिस्थितीत रुग्णांना लागणारा प्राणवायू, अति दक्षता विभाग, व्हेंटिलेटर्स आदी बाबींचे नियोजन आताच करणे आवश्यक आहे. त्यासाठी भुगाव येथील सुरेश देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आणि भारतीय विद्या भवन लॉइड्स विद्या निकेतन भुगाव रोड सेलूकाटे येथे सुमारे 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या दोन्ही इमारती आणि परिसर अधिग्रहित करण्यात आला आहे.

आज पालकमंत्री सुनील केदार यांनी सदर इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी 200 खाटाच्या पहिल्या टप्प्याचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यास सांगितले. रुग्णालयासाठी आवश्यक वीज जोडणी, रोहित्र क्षमता वाढविणे, विद्युत वायरिंग, स्नानगृह व शौचालयसाठी पाणी, पिण्याचे पाणी, मल निस्सारण, इमारतीची रंगरंगोटी, स्वछता, आय.सी. यु. साठी आवश्यक साधन सामग्री, इत्यादी बाबी तातडीने मार्गी लावण्यासाठी काम करावे असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

त्याचबरोबर उत्तम गलवा येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वैद्यकीय कारणासाठी प्राणवायू देणे आवश्यक असल्याचे सांगितले. उत्तम गलवाच्या अधिकाऱयांनी सुद्धा काही काळासाठी स्टील उत्पादन कमी करून 25 ते 30 टक्के ऑक्सिजन रुग्णालयासाठी देण्यास तयारी दर्शवली. याठिकाणी आयनॉक्स कंपनीचा 264 मेट्रिक टन क्षमतेचा प्राणवायू प्रकल्प आहे. यातून जम्बो रुग्णालयासाठी ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्याच्या कामी आयनॉक्स कंपनी आणि इतर तज्ञ व्यक्तींना तात्काळ बोलावून आवश्यक असणाऱ्या तांत्रिक साधनांची मागणी करण्याचा सूचना दिल्यात. शिवाय पालकमंत्री श्री केदार यांनी स्वतः आयनॉक्स कंपनीच्या मालकाशी आणि इतर तज्ञ व्यक्तींशी चर्चा करून विषय मार्गी लावला.

यावेळी सोबत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उत्तम गलवाचे अध्यक्ष बिरेंद्रजी, मुख्य कार्यकारी अधिकारी बिजॉय कुमार, मानव संसाधन सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशांत जावदंड, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, वीज वितरण विभागाचे अधिक्षक अभियंता श्री वानखेडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश माथूरकर,अभिजित सपकाळ आदी उपस्थित होते. दरम्यान काल विभागीय आयुक्तांनी सुद्धा सदर ठिकाणाची पाहणी करून तेथे आवश्यक असणाऱ्या सोई सुविधांचा आढावा घेतला.

सेवाग्राम आणि सावंगी रुग्णलयात अतिरिक्त खाटा वाढवाव्यात – पालकमंत्री

पालकमंत्री सुनील केदार यांनी काल सेवाग्राम रुग्णालयात बैठक घेऊन सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात सुद्धा कोविड रुग्णासाठी आणखी खाटा वाढविण्यास सांगितले. त्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचा सूचना केल्यात. सेवाग्राम येथे 400 बेड सध्या उपलब्ध आहेत, तर सावंगी येथे 618 बेड आहेत. सेवाग्राम येथे 550 बेड वाढविणे आणि सावंगी येथे 220 बेड वाढविण्याच्या सूचना श्री केदार यांनी दिल्यात. यापैकी निम्मे बेड ऑक्सिजन सहित ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. हे काम युद्धपातळीवर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य व परवानग्या तात्काळ देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ नितीन गंगने, डॉ बी एस गर्ग, डॉ एस पी कलंत्री, सावंगी रुग्णालयाचे डॉ अभ्युदय मेघे उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, मनोज खैरनार, नितीन पाटील, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here