
वर्धा : बुलेटवरून ट्रिपलसीट जात असताना भरधाव बुलेट रस्ता दुभाजकावर जाऊन धडकल्याने एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. हा अपघात पिपरी नजीकच्या जुनापाणी चौकात झाला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी १७ मे रोजी रात्री अपघाताचा गुन्हा दाखल केला. अशोक राऊत असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुभाष आत्राम, पुंडलिक शेंद्रे आणि अशोक राऊत हे तिघे बुलेट गाडीवरून ट्रिपलसीट यमुना लॉन परिसरातन मांडवा येथे आंजीमार्गे जात होते. सुभाषने भरधाव बुलेट चालविल्याने बुलेट अनियंत्रित झाली आणि जुनापाणी चौकात असलेल्या रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात सुभाष आत्राम, पुंडलिक शेंद्रे आणि अशोक राऊत हे तिघेही जखमी झाले. तिघांनाही रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असतानाच अशोक राऊत यांचा वाटेत मृत्यू झाला. याबाबतची तक्रार रामनगर पोलिसात बळवंत नामदेव कोहळे यांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास सरु आहे.



















































