
वर्धा : शहरात दारुची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता १२ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. तसेच, मोबाईलसह कारही जप्त केली, मात्र, चालक फरार होण्यात यशस्वी झाला. दारुची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला असता एम.एच. ३८ ए.एम. १०७० क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली.
पोलिसांनी कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने न थांबता कार सुसाट पळविली. पोलिसांनी खासगी वाहनाने कारचा पाठलाग केला असता चालकाने वाहन एका शेतात सोडून तेथून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. कारसह दारुसाठा जप्त करून आरोपी मुकेश जैस्वाल रा. कळंब, जि. यवतमाळ याच्याविरुद्ध देवळी पोलिसांत गुन्हा दाखल केला. ही कारवा्ड पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात केली.



















































