इमारत बांधकाम कामगारांनी रोखला नागपूर-हैदराबाद महामार्ग! पूर्वसूचना न देता पेटी वाटप बंद केल्याचा व्यक्त केला रोष

हिंगणघाट : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत कामगारांना तीन दिवसांपासून विविध साहित्य व लोखंडी पेटी वाटप केली जात आहे; पण रविवारी कुठलीही पूर्वसूचना न देता हे साहित्य वाटप बंद ठेवण्यात आले. त्यामुळे संतप्त कामगारांनी एकत्र येत थेट नागपूर-हैद्राबाद महामार्ग रोखल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कामगारांच्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती. सुमारे एक तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

येथील कलोडे सभागृहात विशेष शिबिराच्या माध्यमातून गुरुवारपासून कामगारांना साहित्याचे किट वाटप केले जात आहे. आपल्यालाही शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रविवारी पहाटे ४ वाजतापासूनच अनेक कामगारांनी कलोडे सभागृह परिसरात पोहोचण्यास सुरुवात केली तर हिंगणघाट तालुक्यातील काही कामगार मध्यरात्रीच येथे पोहोचले होते.

रविवारी सूर्य डोक्यावर आल्यावर या ठिकाणाहून साहित्य वाटप बंद असल्याचे कळताच कामगारांचा पारा चढला. त्यानंतर कामगारांनी संविधान चौकात एकत्र येत नागपूर-हैद्राबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना समज दिली. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here