‘पुष्पा’ सिनेमाचे खुळ डोक्यात शिरले! अल्पवयीनाच्या गळ्यावर चाकूने केले वार; मुलाचे वागणे पाहून पोलीसही अचंबित

वर्धा : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाने तरुणांसह बालमनावरही वेगळेच ‘फिवर’ चढविले आहे. अभिनेत्यासारखे डायलॉग, ॲक्शन आणि राहणीमान देखील तरुण अंगिकारू लागले आहेत. एका १७ वर्षीय मुलाने पुष्पा चित्रपटातील दृश्य डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या मुलाच्या गळ्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अटक केलेल्या अल्पवयीन आरोपीचे वागणे व डायलॉग पाहून पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. पोलिसांनाही थक्क करणारा हा प्रकार मंगळवारी दुपारी सेवाग्राम परिसरातील एका शैक्षणिक संस्थेच्या आवारात घडला.

अल्पवयीन आरोपीचा शालेय शिक्षणापासूनच जखमी युवकाशी वाद होता. या वादातून दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. अखेर आरोपीने जखमी केलेल्या अल्पवयीन मुलाला संपविण्याचे ठरविले. यासाठी त्याने ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्याचे वागणे अंगिकारले आणि दुपारच्या सुमारास महाविद्यालय परिसरात त्या मुलाला अडवून त्याच्या गळ्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांनी घटनास्थळी पोहोचून अल्पवयीन आरोपी मुलास अटक केली. जखमी मुलाला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस विचारपूस केली असता, आरोपीने पोलिसांना पाहून, तुम मुझे कितना भी मार लो ‘मै झुकेगा नही साला’ असे म्हणत पोलिसांशीही हुज्जत घातली. इतकेच नाही तर, ‘मुझे कुछ भी कर लो, लेकीन मेरे माँ-बाप को कुछ मत करना’ असेही आरोपीने पोलिसांना सांगितले. या अल्पवयीन आरोपी मुलाचे असे वागणे पाहून पोलीसही अचंबित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here