

वर्धा : रस्ते अपघातात वेळीच मदत मिळाली तर त्यांचा जीव वाचू शकतो. हाच उद्देश समोर ठेवून केंद्र सरकारने एक योजना तयार केली आहे. सस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणाऱ्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेंतर्गत जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
मागील काही वर्षात रस्ते अपघातात अनेकांना नाहक जीव गमवावा लागला असून, अनेकांना आपले हातपाय गमवावे लागले आहे. महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना रुग्णालयात नेण्यास कुणीही पुढाकार घेत नाही. इतकेच नव्हे तर वेळेवेर उपचार न भेटल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
यासाठी शासनाने यापूर्वी महामार्गावर ‘दूत’ सेवा सुरू केली. आता महामार्गावर अपघात झाल्यास जखमीला रुग्णालयात वेळेवर पोहोचविल्यास पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. हा प्रयोग २०१८ पासून बिहार राज्यात राबविला जात आहे. आता तो सर्व राज्यातही लागू करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केली आहे. यामुळे अपघातात जीव गमविणाऱ्यांचे प्रमाण नक्कीच काही अंशी कमी होणार आहे हे मात्र तितकेच खरे.
१५ ऑक्टोबरपासून सर्व राज्यात लागू होणार नियम
– रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत. ही योजना १५ ऑक्टोबर रोजीपासून सुरू होणार असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
– या योजनेंतर्गत सर्व विभागांना मादर्शका सुचना जारी करण्यात आल्या आहेत. सामान्य मानसाला आपत्कालीन परिस्थितीत रस्ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रेरित करणे हा या योजनेमागील उद्देश आहे.