विदर्भाला राष्ट्रवादीचे झुकते माप

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पक्षाच्या स्थापनेपासून विदर्भात राष्ट्रवादीला बाळसे धरता आलेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आघाडीमुळे सहा आमदार निवडून आले. विदर्भात पक्षवाढीसाठीच विधान परिषदेची उमेदवारी अकोल्याच्या अमोल मिटकरी यांना देण्यात आली; पण यातून पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. कारण पक्षात अल्पावधीतच मिटकरी यांनी महत्त्व प्राप्त केले.

राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेल्या विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एक जागा विदर्भाला देण्यात आली. वास्तविक आतापर्यंत राष्ट्रवादीचे विदर्भाकडे तसे दुर्लक्षच झाले होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत पक्षाला तुलनेत चांगले यश मिळाले.पक्षाचे ५४ पैकी सहा आमदार विदर्भातून निवडून आले. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना एकच आमदार निवडून आला होता. विदर्भाकडे पक्षाचे दुर्लक्ष झाल्याची कबुली अजित पवार यांनी मागे दिली होती. विधान परिषदेच्या आमदारकीकरिता अनपेक्षितपणे पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांचे नाव समोर आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक निष्ठावान, दिग्गज असताना पक्षात नवख्या असलेल्या युवक नेत्याला थेट विधान परिषदेच्या आमदारकीची संधी कशी, या प्रश्नाने राष्ट्रवादीच्या नेत्यांची अंतर्गत खदखद चांगलीच वाढली आहे.
अकोला जिल्हय़ातील कुटासा येथील शेतकरीपुत्र असलेल्या अमोल मिटकरी यांनी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडमधून कार्याला सुरुवात केली. मिटकरी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. राष्ट्रवादीत काम करण्यास सुरुवात झाल्यावर त्यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी आली. पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मिटकरींनी वक्तृत्वाच्या जोरावर अनेक सभा गाजवल्या. ही बाब त्यांच्या पथ्यावर पडलीच, पण त्याचबरोबर अजित पवार यांचा आशीर्वाद त्यांना उपयोगी आला. आता थेट आमदारकी मिळाली. लिंगायत वाणी समाजाची मोठी संख्या अमोल मिटकरींच्या जमेची ठरली.
विदर्भाच्या वाटय़ाला आमदारकी आली असली तरी नवख्या नेत्याला संधी मिळाल्याने प्रस्थापित नेत्यांना हा मोठा धक्का समजला जातो. विदर्भात पक्षाला अजूनही उभारी घेता आलेली नाही. पक्षाचा पाया विस्तारण्याच्या उद्देशानेच विदर्भातील अनिल देशमुख यांच्याकडे गृहसारखे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. अमोल मिटकरी यांच्या आमदारकीमुळे अकोला, वाशीम पट्टय़ात पक्षाचा पाया अधिक विस्तरावा, असाच पक्षाचा प्रयत्न असेल. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही मिटकरी यांना आपला प्रभाव पाडावा लागेल.

अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान
अकोला जिल्ह्य़ात काँग्रेस संघटना कमकुवत झाली आहे. याचा फायदा उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. भाजप, शिवसेना, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पक्ष असे प्रस्थापित पक्ष असताना त्यातून राष्ट्रवादीला स्वत:चे स्थान निर्माण करावे लागेल. मिटकरी यांच्या रूपाने राष्ट्रवादीने विदर्भात तरुण आमदार दिला आहे. त्याचा फायदा किती होतो हे कालांतराने स्पष्ट होईल, पण पक्षाने संदेश तरी चांगला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here