

मोझरी (शे.) : शेतकऱ्यांसह शेतमजूर, महिलांना शेतात जाण्यासाठीचा रस्ता एका व्यक्तीने अडविला. परिणापी, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतात जायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. काही शेतमजूर, महिलांनी त्या व्यक्तीला विचारणा केली असता, रस्त्याने जायचे नाही, मी फार खराब माणूस आहे, असा धमकीवजा सज्जड दम देण्याचा प्रकार सुरू आहे.
मोझरी शिवारातील करंजकर यांच्या सर्व्हे नं. २२ या शेतालगतच्या बांधावरून पूर्वीपासूनच समोरील शिवारातील शेतकरी आवागमन करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून एका अज्ञात व्यक्तीने आवागमन करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, महिलांना दमदाटी करून या रस्त्याने जायचे नाही, असे म्हणून चक्क रस्ताच अडविला. परिणामी शिवारातील इतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जायचे कसे? असा गंभीर विषय निर्माण झाला आहे.
याप्रकरणाची शेतकऱ्यांनी महसूल, तलाठी कार्यालय तसेच तंटामुक्ती समितीकडे तक्रार केली आहे. याची प्रशासनाने दखल घेत शेतकऱ्यांचा हक्काचा पूर्वीपासूनचा रस्ता आवागमनासाठी खुला करावा, तसेच त्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.