

अल्लीपूर : गावात ४५ वयोगटाच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र अजूनही १८०० नागरिकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जे नागरिक लसीकरण करणार नाहीत त्यांना रेशनचे धान्य देऊ नका, अशी सूचना बैठकीत सरपंच नितीन चंदनखेडे यांनी उपस्थितांना केली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच नितीन चंदनखेडे होते. वा वेळी ग्रा. पं. सदस्य सतीश काळे, सचिन पारसडे, बच्चू वाटखेडे, सुनीता लिचडे, प्रतिभा ढगे, डॉ. निखिल टिचकुले, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे आदी उपस्थित होते. या बैठकीला गावातील सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, नोडल अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना करण्यात आली. गावात लसीकरण शंभर टक्के व्हावे व सर्व नागरिकांनी तिसरी लाट येण्याअगोदर लस घेऊन स्वत:चा व परिवाराचा बचाव करावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ४४ च्या वर असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली नाही त्यामुळे गावातील १८०० नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे, अशी माहिती सरपंच चंदनखेडे यांनी दिली.
कोविड लसीकरण न करणाऱ्या कुटुंबाला सरकारी धान्य मिळणार नाही. लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र धान्य दुकानदार यांना दाखविल्यानंतरच रेशन धान्य दिले जाईल शासकीय योजनांचाही लाभ घेता येणार नाही, असे बैठकीत ठरविण्यात आले.