

आर्वी : जेथे मृतात्म्याला अखेरचा निरोप दिला जातो, त्या भूमीवर दिवसरात्र राहायचे म्हटले, तर अंगावर काटा उभा होतो. मात्र, येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाने शेतीकरिता स्मशानभूमीची जागा निवडून व तेथेच निवास करून तेथे सेंद्रिय शेती फुलविली आहे. त्यांचा हा अनोखा प्रयोग चर्चेचा विषय व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
या जागेवर शेतीसोबतच पिकनिक स्पॉट, लहान मुलांसाठी खेळणी, बगीचा व फुलझाडे लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली. बोहरा समाजाच्या प्रतिनिधींना ही संकल्पना पटल्याने वानखेडे यांनी ५५ हजार रुपयांमध्ये पाच एकर शेती ठेक्याने घेतली. त्यांनी ठरल्याप्रमाणे ही शेती विकसित केली. यामुळे आता येथे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. हा ओसाड परिसर पिकनिक स्पॉटच झाला आहे. बोहरा समाजातील कुटुंबीय या परिसरात येऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतात. इतरही नागरिक विरंगुळा म्हणून या ठिकाणी वेळ घालवतात. सेवानिवृत्त प्राध्यापकाची आता स्मशानात राहणारा मनुष्य म्हणून शहरात ओळख निर्माण झाली आहे.