


वर्धा : कामगारांचे शोषण थांबवा, अन्यथा देशव्यापी आंदोलन उभारले जाईल, अशी ठाम गर्जना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक इंजि. तुषार उमाळे यांनी केली. त्यांचा सपत्नीक भव्य सत्कार समारंभ वर्ध्यातील अनुसया मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास कामगार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा सत्कार सोहळा संभाजी ब्रिगेड प्रणित अवचट इंडस्ट्री प्रा. लि., आशा इंडस्ट्री प्रा. लि. व सागर इंडस्ट्री प्रा. लि. कामगार संघटनेच्या सदस्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र कडू होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री मा. रणजीत कांबळे उपस्थित होते. विशेष पाहुण्यांमध्ये जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारणी सदस्य योगिता इंगळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अशोक वेले, आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ऍड. गुरुराज राऊत, काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री उमाळे पुढे बोलताना म्हणाले की, मागील व आताच्या सरकारने कंत्राटीकरण व विविध कामगार विरोधी धोरणांमुळे कामगारांचे शोषण सुरू केले आहे. आज देशभरातील कामगार देशोधडीला लागला आहे. येणाऱ्या काळात कामगारांनी एकजूट होऊन संघर्ष उभारला नाही तर शोषण वाढतच जाईल. त्यांनी हा सत्कार आपल्या सहकाऱ्यांना अर्पण करत आयोजक कामगार संघटनेच्या सदस्यांचे आभार मानले.
कार्यक्रमात ॲड. गुरुराज राऊत यांनी कामगारांचे कायदेशीर अधिकार व कामगार कायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी कायद्याचा वापर करून लढा दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे रणजीत कांबळे यांनी म्हटले की, इंजि. तुषार उमाळे यांनी कामगारांच्या न्यायासाठी मोठी चळवळ उभारली आहे. अनेक कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. सरकारने नुकताच केलेला १२ तासांचा कायदा हा कामगारांवरील अन्याय असून, या विरोधात कामगारांनी एकजूट दाखवली पाहिजे.
या वेळी योगिता इंगळे, अशोक वेले व चंद्रशेखर मडावी यांनीही आपले विचार व्यक्त करत उमाळेंच्या कामगार लढ्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण सभागृह घोषणांनी दुमदुमून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव निखाडे यांनी केले. सूत्रसंचालन विद्या नरड यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश जगताप यांनी केले.