प्रश्न विचारणारी नवी पिढी घडवली पाहिजे : गजेंद्र सुरकार ! कस्तुरबा विद्यालय सेवाग्राम येथे वैज्ञानिक दृष्टिकोनावर मार्गदर्शन सत्र

सेवाग्राम : बालवाडीपासूनच विद्यार्थ्यांना ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ शिकवून फक्त ऐकण्याची, न बोलण्याची सवय लावली जाते. परिणामी, पुढे जाऊन हेच विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत आणि चुकीच्या गोष्टींना अंधपणे स्वीकारतात. आज आपल्याला नव्या शिक्षणपद्धतीतून प्रश्न विचारणारी नविन पिढी घडवावी लागेल, असे स्पष्ट मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले.

कस्तुरबा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सेवाग्राम येथे वर्ग पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ दिवसीय सेल्फ डिफेन्स आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुरकार यांचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज या विषयावर विशेष मार्गदर्शन झाले. यावेळी शाळेचे प्राचार्य उमेश गायकवाड मंचावर उपस्थित होते.

मार्गदर्शनात बोलताना सुरकार म्हणाले, आज विविध परीक्षा, प्रश्नपत्रिकांमध्ये चुकीचे किंवा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आल्यावर विद्यार्थ्यांना पर्यायच सापडत नाही. कारण त्यांनी विचार करायची, विचार मांडायची सवयच लावलेली नसते. त्यामुळे अशी पिढी संकटांना वैज्ञानिक दृष्टिकोनाने न भिडता अंधश्रद्धेच्या आहारी जाते.

ते पुढे म्हणाले, प्रश्न विचारल्यामुळेच मानवाचा विकास झाला. निरीक्षण, तर्क, प्रयोग यांमुळे विज्ञान निर्माण झाले. पण आज आपण पुन्हा पाच हजार वर्षांपूर्वीच्या अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकतो आहोत पूजापाठ, ग्रहदोष, लिंबू-मिरची, भानामती, बुवाबाजी यातून मानसिक, लैंगिक आणि आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर होते. सुरकार यांनी या सत्रात प्रत्यक्ष प्रयोग दाखवत बुवाबाबा, पीर, पाद्री, मौलवी यांचे चमत्कार फसवणुकीचे कसे असतात हे प्रत्यक्ष दाखवून दिले. “कोणताही चमत्कार हा हातचलाखीचा भाग असतो, विज्ञानाच्या प्रयोगाने तो उलगडता येतो,” असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर समन्वयक भारती गेडाम यांनी केले. सूत्रसंचालन तृप्ती जामिनकर हिने केले तर आभारप्रदर्शन विजया घोंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी नम्रता लाखे, जयश्री झाडे, वैशाली वैरागडे, प्रशांत मेश्राम, गौरव तामताडगे, कोमल साखरे, अंजली ठाकरे, सोनल गुडसुंदरे, प्रीती उईके, अनिता सारवे, रेखा नवघरे, प्रीती गौरखेडे, प्रेरणा सावल, योगेश्वरी तुराळे, किरण गौरखेडे, अर्चना बाभुळकर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here