

वर्धा : प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची साठवणूक करणाऱ्यावर कारवाई करीत त्याच्याकडून तब्बल १ लाख ६ हजार ३६० रुपयांचा सुगंधित तंबाखूसाठा जप्त केला. खरांगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर दोघे जण फरार असून, त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.
महेंद्र पांडुरंग रेवतकर (४२, रा. आंजी (मोठी)) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर विराग वैरागडे, मे. नवप्रभात ट्रेडर्स. बुद्धीबोरी आणि शुभम होलानी (रा. वर्धा) हे दोघे फरार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खरांगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना आंजी येथील आरोपी महेंद्र रेवतकर हा सुगंधित तंबाखू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध सुरक्षा विभागाला याची माहिती देत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेत पंचासमक्ष आरोपीच्या निवासस्थानी छापा मारला असता सुगंधित तंबाखूची विक्री करताना
मिळून आला.
आरोपीला विचारणा केली असता सुगंधित तंबाखू विराग वैरागडे आणि शुभम होलानी यांच्याकडून खरेदी केल्याचे व बिल नसल्याचे सांगितले. तिन्ही आरोपींविरुद्ध खरांगणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, मनीष कांबळे, पवन पन्नासे, नितीन इटकरे, प्रदीप वाघ यांनी केली.