टिप्परमधून पडल्याने क्लीनर जखमी! चालक वाहन सोडून पसार

समुद्रपूर : धावत्या टिप्परमधून क्लीनर खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील गोविंदपूर शिवारात घडली.

संतोष चाचक (वय २७, रा. शास्ती वॉर्ड, हिंगणघाट) असे जखमी क्लीनरचे नाव आहे. या अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी एमएच ३१ डीएस ०९०२ क्रमांकाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परपासून १०० मीटर अंतरावर संतोष निपचित पडला होता. चालक रवी उर्ईके हा पसार झाला. महामार्ग पोलीस चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, ज्योती विष्णू राऊत, प्रदीप डोंगरे, पंकज वैद्य यांनी जखमीला रुग्णवाहिकेने समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी संतोषवर सेवाग्राम येथे उपचार सुरू असून, या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here