रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रहारचे दफन आंदोलन! प्रशासन हादरले

आर्वी : तीन वर्षांपासून आर्वी मतदार संघातील प्रमुख महामार्ग आर्वी- तळेगाव, आर्वी-कौंडण्यपूर, आर्वी-वर्धा या रस्त्यांचे भीजत घोंगडे आहे. तीन वर्षांपासून तिन्ही रस्ते खोदून ठेवण्यात आले. मात्र, त्या रस्त्याचे काम अजूनपर्यंत चालू केले नाही. परिणामी अनेक वाहन चालकांना अपघाताने गंभीर दुखापत, अपंगत्व आले. मात्र, प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे. पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने या तिन्ही रस्त्यावर सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण नसल्याने पूर्ण रस्ते चिखलमय झाले आहे. यामुळे नागरीकांना अतोनात त्रास होत होता परिणामी रस्त्यावर प्रहारच्या वतीने बाळा जगताप यांच्या नेतृत्वात दफन आंदोलन करण्यात आले.

आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांची व बघणार्‍यांची गर्दी एवढी होती की सदर रस्त्यावर एक तास वाहतूक खोळंबली होती. बाळा जगताप यांनी अचानक घेतलेल्या या अफलातून आंदोलनात्मक पवित्र्यामुळे प्रशासन पूर्णपणे हादरले होते. जगताप यांना आंदोलनस्थळी भेटण्याकरिता तहसीलदार चव्हाण आले असता आंदोलनाची भीषणता बघता प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर आंदोलन थळी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैभवी वैद्य, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनुले, उपनिरीक्षक ठावरे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.

आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर कार्यकारी अभियंता वैद्य यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जगताप लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर ठाम असल्याने अधिकार्‍यांनी सकारात्मक चर्चा करून येत्या काही दिवसात तिन्ही रस्ते वाहतूक योग्य करून देऊन बाकी कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले. आश्वासनाअंति आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

दिलेल्या वेळेत जर रस्त्यांचे काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात येईल त्यानंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा वेली बाळा जगताप यांनी दिला. आंदोलनाच्या वेळी सुधीर जाचक, अरसलान खान, प्रशांत क्षीरसागर, सय्यद जुनेद, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here