जिल्ह्यात १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद! तिघांचा घेतला बळी : ६५ रुग्णांवर उपचार सुरू

वर्धा : नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या जिल्ह्यात कासवगतीने का होईना पण म्युकरमायकोसिस हा आजार डोकेवर काढू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी तिघांचा या बुरशीजन्य आजाराने बळी घेतला आहे. तर सध्या ६५ रुग्ण अंडर ट्रिटमेंट असल्याचे सांगण्यात आले.

बुरशीजन्य संसर्ग असलेला म्युकरमायकोसिस हा प्रामुख्याने मधुमेह, वयोवृद्ध तसेच पूर्वीच विविध आजार असलेल्यांना होतो. रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी हा आजार जीवघेणा ठरणारा आहे. त्यामुळे कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभोवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून आतापर्यंत जिल्ह्यात १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी तिघांचा जीवघेण्या या बुरशीजन्य आजाराने बळी घेतला असून ३९ रुग्णांनी त्यावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या ६५ रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोविड हिस्ट्री नाही तरी तिघांना म्युकरचा संसर्ग

जिल्ह्यात सापडलेल्या १०७ म्युकरमायकोसिस बाधितांपैकी १०३ रुग्णांची कोविड हिस्ट्री आहे. पण तीन रुग्णांची कोविड हिस्ट्री नसतानाही त्यांना या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोविड सोबतच म्युकरमायकोसिस बाबत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here