लॉकडाऊन काळात १२.५० टक्क्यांनी वाढली विजेची मागणी! गतवर्षी ४० टक्क्यांनी घटली; शहरातील ३४ हजार ५०० ग्राहकांकडून होतोय नित्य वापर

वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही कडक लॉकडाऊन करण्यात आले असले तरी मागीलवर्षीच्या तुलनेत वर्धा शहरात विजेची मागणी १२.५० टक्क्यांनी वाढल्याची माहिती वीज महावितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.

मागीलवर्षीपासून देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाने कहर केला. या पार्श्वभूमीवर तब्बल चार ते पाच महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत बाजारपेठेतील सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, कापड आदी सर्वच दुकाने ठप्प होती तर दुसरीकडे कुलरमुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होत असल्याची अफवा पसरल्याने भर उन्हाळ्यात कुलरच्या वापरावरही अनेकांनी बंदी घातली होती. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत विजेची मागणी ४० टक्क्यांनी घटली होती.

वर्धा शहरात ३४ हजार ५०० वीज ग्राहकांची संख्या आहे. २०१९ मध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केवळ शहरात १४०९ अ‍ॅम्पियर म्हणजे २७.१० मेगावॅट इतका वीजपुरवठ्यापोटी वीज महावितरणवर भार होता तर २०२० मध्ये (८६७ अ‍ॅम्पियर) १६.६७ इतका कमी भार होता. लॉकडाऊनमुळे विजेचा व्यावसायिक, औद्योगिक वापर बंद होता. ग्राहकांकडून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होणारी विजेची मागणीही घटल्याने १० मेगावॅट भार गतवर्षी कमी झाला. यंदाही मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले. एप्रिल महिन्यांत कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूसंख्येचा आलेख चढताच राहिला.

यामुळे लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. ८ पासून ३१ मेपर्यंत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या काळात विजेची व्यावसायिक मागणी केवळ कमी होती. मात्र, गतर्षीच्या तुलनेत व्यावसायिक, औद्योगिक आणि घरगुती विजेची मागणी नोंदविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here