प्लेग आणि कॉलर्यानेही नागपुरकरांना त्रस्त केले होते

विदर्भ वतन / नागपूर : १८९९ साली नागपुरात प्लेगची साथ आली होती.  तेव्हा लोक फारसे आरोग्याप्रती जागरूक नव्हते आणि प्रभावी यंत्रणाही नव्हत्या. १९०३ साली प्लेगची साथ पुन्हा पसरली त्यात ९,२०८ लोकांचा मृत्यू झाला. नंतर १९०६ साली पुन्हा एकदा प्लेगने शिरकाव केला जो १९१२ पर्यंत कायम होता. या काळात त्याने १५ हजार ९९५ लोकांचा बळी घेतला. ६ आॅक्टोबर १९०९ या एकाच दिवशी २०२ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
त्या काळात आरोग्याच्या सुविधा नव्हत्या आणि शिक्षणाचे प्रमाणही फारच कमी होते, तरीदेखील लोकांनी आरोग्ययंत्रणेला मदत केली होती. ऐन पावसाळ्यात तीन चतुर्थांश लोकांनी शहर सोडून शहराबाहेर उभारलेल्या शिबिरात आसरा घेतला.  त्यावेळी अंबाझरी परिसरातील झोपडपट्टीमध्ये ओळीने प्लेगचे रूग्ण आढळले होते. तेव्हा त्या गरीब लोकांनी आपल्या झोपड्या जाळून टाकण्याची परवानगी दिली. १९११ मध्ये कॅप्टन मारिसन यांच्या नेतृत्वात पथके तयार करण्यात आली. त्यात दोन असिस्टंट सर्जन, दोन उपअसिस्टंट सर्जन आणि तीन नायब तहसीलदार यांचा समावेश होता. या पथकाने उंदरांचा नाश करण्याचा धडाका लावला. मेयोमध्ये २१ खाटांचे एक शेड बांधण्यात आले होते. यावर आळा बसावा म्हणून प्लेग संशयीतांना प्रतिबंधात्मक लस टोचून घेणे बंधनकारक करण्यात आले होते. सुरूवातीला लोक घाबरून संमती देत नसत, तेव्हा जो लस टोचून घेईल त्याला बक्षीस देण्याची योजना राबविण्यात आली होती. यानंतर जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा लोक स्वत:च प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी स्वत:हून पुढे आले. १९११-१२ मध्ये प्रशासनाने ३२ हजार उंदीर मारले होते, ही नोंद महानगरपालिकेत अजुनही आहे.
याचेप्रमाणे कॉलराने १९०७ साली १२२, १९०८ मध्ये १३८ जणांचा मृत्यू झाला. १९१४ साली महादेवाच्या डोंगराहून आलेल्या काही यात्रेकरूंनी शहरात कॉलना आणला आणि पाच आठवड्यात ३१७ जणांचा बळी गेला. पहिली काही वर्षे सोडली तर शहर प्रशासनाने कॉलराची चांगली उपाययोजना केली. १९५७-५८ पासून तर कॉलरा फारसा दिसून आला नाही. त्यानंतर शहरात मलेरिया, फायलेरिया विभाग सुरू करण्यात आले. गोळ्यांचे वाटप सुरू झाले. देवीच्या लसी दिल्या गेल्या यातूनच शहरातील साथरोग नियंत्रणात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here