डोळ्यात तिखट टाकत दगडाने ठेचून केली हत्या! शेताच्या धुऱ्याचा वाद गेला विकोपाला

वडनेर : शेताच्या धुऱ्याचा वाद विकोपाला जात थेट हत्याच करण्यात आल्याची घटना वडनेर येथे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, ही घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली असून दिनेश मारोती महाजन (४०) असे मृताचे नाव आहे. आरोपीने सुरुवातीला दिनेशच्या डोळ्यात तिखट फेकले. त्यानंतर त्याने निर्दयतेचा कळस गाठून दिनेशच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याला जीवानिशी ठार केले. या प्रकरणातील आरोपीला वडनेर पोलिसांनी अटक केली आहे.

वडनेर येथील रहिवासी दिनेश मारोती महाजन याने गावातीलच प्रमोद दादाजी भाके (६०) याच्याकडून पाच एकर शेतजमीन विकत घेतली. परंतु, शेतातील धुऱयावरून दोघांत वेळोवेळी खटके उडत होते. हाच वाद आज विकोपाला गेला. आरोपी प्रमोद भाके याने रविवारी सकाळी दिनेशला मोठ्या लाडी-गोडीने वाहनावर बसवून शेतात नेले. दिनेश आणि प्रमोद हे दोघेही शेतशिवारातील बंधाऱ्याजवळ आले असता प्रमोदने थेट दिनेशच्या डोळ्यात तिखट फेकले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने जमिनीवरील दगड उचलत तो दिनेशच्या डोक्यावर मारून त्याची हत्या केली. या प्रकरणी वडनेर पोलिसांनी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी प्रमोद भाके याला अटक केली आहे. पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here